Thursday, June 30, 2011

म्हैसमाळ - एक अविस्मरणिय अनूभव

पावसाळा

पावसाळा म्हणजे जवळपास सर्वांचाच आवडता ऋतू. पावसाळ्यात निसर्गाचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी अनेक निसर्गप्रेमी आपल्या सुट्टयांचे नियोजन करायला लागतात. एखादे हिलस्टेशन, धबधबा अथवा डॅम अशा ठिकाणी हे निसर्गप्रेमी गर्दी करायला लागतात. असाच काही अनुभव आपल्याला औरंगाबाद पासून जवळपास २५ किमीवर असलेल्या 'म्हैसमाळ' या ठिकाणी येईल.

म्हैसमाळला (महेशमाळ) सुध्दा म्हणतात. कॉलेजच्या युवक युवतींचे तर हे आवडते ठिकाण. जसा कोणता सुट्टीचा वार, अथवा एखादी सुट्टी मिळाली की हे तरुण-तरुणी म्हैसमाळकडे आपोआपच वळतात आणि त्यातल्या त्यात पावसाळ्यात तर कॉलेज बुडवून जाणाऱ्यांची संख्या ही दूप्पट होते. म्हैसमाळ या हिलस्टेशनचे आणखी एक महत्व म्हणजे इथे असलेले बालाजी मंदीर. या बालाजी मंदीराकडे जाताना आपल्याला जणू खऱ्या तिरुपती बालाजीला जातानाचा भास निर्माण होतो. तसाच घाट, तसेच निसर्ग आणि तोच वळणावळणाचा रस्ता यामुळे औरंगाबादकर यालाच छोटा तिरुपती म्हणतात. या मंदीरात पुजारी देखील तिरुपती बालाजीच्या मंदीरासारखेच आंध्रप्रदेशातील आहेत.

पाऊस पडला की येथे ढगांची धावपळ आपल्याला स्पर्श करु लागते. जणू आपण ढगांवर उभे आहोत असा भास व्हायला लागतो. थंड वारा, चारीही बाजूला धूके दूरवर फक्त ढग आणि ढग दिसते. पर्यटकांचे येथे येण्याचे प्रमाण वाढत असल्याने येथे ३ व्ह्यू पॉईंट बांधण्यात आले आहेत. या व्ह्यू पॉंईंटवरुन दिसणाऱ्या दृशांचे वर्णन शब्दांत करायचे म्हटले की, शब्द अपूरे पडायला लागतात.

असे लोभसवाणे दृष्य पाहून तेथून परत यायला आपले मन होत नाही. अगदी जड पावलांनी तेथून निरोप घेण्याचा अनुभव तेथे पावसाळ्यात गेलेल्या प्रत्येकालाच आला असेल.
















एकदा नक्की भेट द्या... म्हैसमाळ ला...

अतूल्य भारत, अतूल्य महाराष्ट्र, आणि अतूल्य औरंगाबाद...